मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकात, लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली. पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी सायंकाळी हा दूरध्वनी आला होता. त्यानंतर सर्व रेल्वे स्थानकांमध्ये कसून तपासणी करण्यात आली. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी रात्रभर रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी करण्यात येत होती.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस महासंचालकांच्या कार्यालातील नियंत्रण कक्षात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक निनावी दूरध्वनी आला. मुंबईतील रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने दिली. नंतर तात्काळ त्याने फोन ठेवून दिला. पोलिसांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता.
धमकीचा दूरध्वनी एक अफवा
फोनवर देण्यात आलेल्या धमकीची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना दिली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शाळा, शासकीय कार्यलये, दूतावास आदींना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत होत्या. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने हा दूरध्वनी पोलिसांनी गांभीर्याने घेतला. फोन करणाऱ्या व्यक्तीने ठिकाण सांगितले नव्हते. फक्त मुंबई रेल्वे असा उल्लेख केला होता. त्यामुळे सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आणि तपासणी करण्यात आली. मात्र कुठेही काहीही संशयास्पद आढळले नाही.
रात्रभर तपासणी
शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून रात्रभर सर्व रेल्वेस्थानक परिसराची तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानकातील लांबपल्ल्याच्या गाड्या, उपनगरीय रेल्वे, मालगाड्या आदींची तपासणी करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढण्यात आला. रेल्वे स्थानकात रेंगाळणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. रेल्वे पोलिसांबरोबर, गृहरक्षक (होमगार्ड), रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही (आरपीएफ) या शोध मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.