मुंबई : विवाहनोदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख काढून पीडित महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपाप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. अशाच आणखी एका प्रकरणात याचिकाकर्त्यावर गुन्हा दाखल असल्याचीही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने त्याचा जामीन नाकारताना दखल घेतली. पहिल्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर याचिकाकर्त्याला अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत अशाच प्रकारच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे, लग्नाचे आमिष दाखवून याचिकाकर्त्याने पीडित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट होते. याचिकाकर्त्याने अवलंबलेली हीच पद्धती न्यायालयाला त्याच्या बाजूने विचार न करण्यास परावृत्त करते हेही एकलपीठाने त्याला दिलासा नाकारताना प्रामुख्याने नमूद केले.

हेही वाचा >>> बँक कर्मचाऱ्याकडून फसवणूक झालेल्या महिलेच्या खात्यात २.९ कोटी रुपये जमा; एचडीएफसी बँकेची उच्च न्यायालयात माहिती

आमच्यातील शारीरिक संबंध हे परस्पर सहमतीने होतो, असा दावा याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला. तसेच, नातेसंबंधात असल्यामुळे त्यांच्यात अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचेही त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याने लैंगिक अत्याचाराचे आरोप करून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला होता.

हेही वाचा >>> दहिसरमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण प्रकल्पाची आयआयटी मुंबईच्या चमूकडून पाहणी

तथापि, घटनेच्या २५ दिवस आधीच याचिकाकर्त्याने पीडितेच्या आईची भेट घेऊन आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाणघेवाण केली. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून याचिकाकर्त्याने पीडितेसह शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याच्यावर या आधीही अशाच प्रकारे अन्य एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, याचिकाकर्त्याला जामीन दिल्यास तो अशाच प्रकारे आणखी काही महिलांचे लैंगिक शोषण करू शकतो. म्हणून, त्याला जामीन देणे योग्य ठरणार नसल्याचे न्यायालाने जामीन अर्ज नाकारताना स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

याचिकाकर्त्याने ३० सप्टेंबर २०२२ रोजी पीडितेला कांदिवली येथे बोलावले. मद्यपान आणि जेवण केल्यानंतर याचिकाकर्त्याने तिला दहिसर येथील एका लॉजवर नेले आणि तिच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दुसऱ्या दिवशी अर्जदाराने तिला पुन्हा गोरेगाव येथील दुसऱ्या लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर, याचिकाकर्त्याने पुन्हा तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिता तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. घरी परतल्यानंतर तिने घडला प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर दोघींनी पोलिसांत जाऊन याचिकाकर्त्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली.