चित्रपट परिनिरिक्षण मंडळाच्या फेरविचार समितीने सुचवलेले बदल आपल्याला मान्य नसल्याचे सांगत चित्रपटाचा सहनिर्माता अनुराग कश्यप याच्या ‘फॅण्टम फिल्म्स’ या कंपनीने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होईल.
समितीने चित्रपटातून काही दृश्ये तसेच चित्रपटाच्या शीर्षकातून ‘पंजाब’ हा शब्द वगळण्याची शिफारस केली होती. अर्थात यासाठीचे प्रमाणपत्र समितीने देणे आवश्यक होते. म्हणजे निर्मात्यांना हे सुचविलेले बदल मान्य नसल्यास त्याला अपिलेट लवादाकडे दाद मागता आली असती. मात्र, वारंवार मागणी करूनही हे प्रमाणपत्र देण्यात न आल्याने अखेर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.हे प्रमाणपत्र अद्याप का देण्यात आले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर दोन तासांमध्ये हे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले.

मंडळाच्या मनमानीवर निर्मात्यांची टीका
मुंबई : ‘उडता पंजाब’च्या निमित्ताने गेली दोन वर्षे सेन्सॉर बोर्डाच्या सुरू असलेल्या मनमानीवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज निर्माते-दिग्दर्शक बुधवारी जाहीरपणे पत्रकार परिषद घेत बरसले.
चित्रपटांतील आक्षेपार्ह दृश्ये, भाषा वगळण्याच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड सिनेकलाकृतींची बेसुमार कत्तल करत आहे. त्याचमुळे ‘फिल्म सर्टिफिकेशन अ‍ॅपिलेट ट्रिब्युनल’कडे दाद मागणाऱ्या चित्रपटांची संख्या विक्रमी संख्येने वाढली आहे. याचा अर्थ एक तर दिग्दर्शक चित्रपट तरी वाईट बनवितात किंवा बोर्डाच्या अध्यक्षांचा मनमानीपणा तरी सुरू आहे, अशा कडक शब्दांत निर्माता-दिग्दर्शकांनी सेन्सॉर बोर्डाची हजेरी घेतली.
‘इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन’ने आयोजिलेल्या या परिषदेला हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्माते इम्तियाज अली, आनंद एल. एम., सुधीर मिश्रा, महेश भट, मुकेश भट, राहुल ढोलकिया, झोया अख्तर या नावाजलेल्या दिग्दर्शकांनी उपस्थिती लावून सेन्सॉरशिपविषयीच्या आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या.