मुंबई : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एसटीपीसीने या युनिटसाठी अर्थसहाय्य दिले आहे.

याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपक्रमांतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) युनिट उभारणी आणि गरजू रुग्णांसाठी उपचार सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे.

एम्स नागपूरमध्ये पहिल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या स्थापनेसाठी एनटीपीसी कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले. हे केंद्र मध्य भारतातील संपूर्ण जनतेसाठी, विशेषतः लहान मुले, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी, एक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरेल. मध्य भारतात सिकल सेल आजार आणि इतर आनुवंशिक रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या रोगांचे उच्चाटन करणे हे देशाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. एनटीपीसी कडून या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एनटीपीसीकडून बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या पायाभूत सुविधांसाठी, रुग्णांच्या उपचार व औषधोपचारासाठी सहाय्य देण्यात येणार आहे. हे युनिट एम्स नागपूरच्या एमआयएचएएन येथील परिसरात उभारले जाणार आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसह, प्रत्यारोपणासाठी आवश्यक तपासण्या, औषधे, बाह्य तज्ज्ञांच्या सेवा, व रुग्णोपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे.

एनटीपीसी मोंडा गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात सामाजिक दायित्व अंतर्गत विविध प्रकल्प राबवत आहे. एम्स नागपूरसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून समाजातील गरजू घटकांपर्यंत अत्याधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम्स नागपूर हे प्रगत वैद्यकीय सेवा व संशोधनासाठी झपाट्याने नावारूपाला येत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या स्थापनेमुळे ब्लड कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील उपचार नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना मिळणार असून, त्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.