मुंबई : गोराईमध्ये आकारास आलेल्या कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबरमध्ये ते पर्यटकांसाठी खुले होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीने सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून भारतातील पहिले कांदळवन उद्यान साकारले आहे. त्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या सुमारे ८०० मीटर लांबीच्या उंच लाकडी मार्गावरून निसर्गाचे जवळून दर्शन घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांना कांदळवन देखभाल आणि पर्यटन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करण्याचा सरकारचा मानस आहे.
राज्य शासनाने कांदळवन उद्यान उभारण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. त्यांनतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बोरिवली येथील गोराई खाडीजवळील जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला आहे. कांदळवन आणि किनारी परिसंस्थेतील जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गोराईत कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे उत्तर मुंबईतील हरित क्षेत्रात वाढ होणार आहे.
या प्रकल्पात ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’साठी दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यात कार्यशाळा कक्ष, ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल कक्ष, माहिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, लाकडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ८०० मीटर लांबीच्या मार्गिकेवरून कांदळवनाची परिसंस्था जवळून पाहता येणार आहे. पीयूष गोयल यांनी सातत्याने या कामांचा आढावा घेतला होता. मुंबईतील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठका घेऊन प्रकल्पाच्या कामावर त्यांनी लक्ष ठेवले होते.
दरम्यान, या प्रकल्पासाठी एकाही खारफुटीची कत्तल करण्यात आलेली नाही. गोराई पाठोपाठ दहिसरमध्येही कांदळवन उद्यान उभारत येत आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पर्यावरणीय पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दहिसरमधीलसुमारे ३० हेक्टर राखीव वनक्षेत्रावर कांदळवन उद्यान उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश कंत्राटदाराला ८ एप्रिल रोजी देण्यात आले असून त्यांनतर तात्काळ प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा प्रकल्प २४ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
- अधिकृतरित्या पर्यावरणीय पर्यटन प्रकल्प म्हणून मंजुरी.
- मॅंग्रोव्ह पाथवेज – उद्यानातील सर्व घटकांना जोडणारे माहितीपर मार्ग.
- नेचर इंटरप्रिटेशन सेंटर.
- ४०० मीटर लांबीचा मॅंग्रोव्ह ट्रेल
- खेकडे तलाव आणि सेल्फी पॉइंट्स
- फ्लोटिंग जेट्टी आणि कयाक ट्रेल्स
