मुंबई : पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी २७ वर्षीय तरूणाला अटक केली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पोलीस शिपाई संदीप चंपतराव सोनकांबळे यांना शिवीगाळ करून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत आरोपीचे तीन साथीदारही सहभागी होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संदीप सोनकांबळे हे दहिसर येथे राहत असून सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सोनकांबळे बीट मार्शल असल्यामुळे परिसरात गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते २० मे रोजी रात्री कामावर हजर झाले. सोनकांबळे २० मे रोजी मध्यरात्री ३ च्या सुमारास सोनकांबळे बोरिवली पश्चिम येथे गस्त घालत होते. त्यावेळी बोरिवलीतील बाभईनाका परिसरात गौरव त्याच्या तीन साथीदारांसोब दारुच्या नशेत गोंधळ घालत होता. सोनकांबळे यांनी त्यांना हटकले व कुठे राहतात असे विचारले. त्यावेळी त्यांनी गोरेगाव असे सांगितले. त्यावेळी सोनकांबळे यांनी चारही तरूणांना गोंधळ न घालता घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने गौरवसह इतर तिघांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाणही केली.
सोनकांबळे यांच्या हातात वॉकीटॉकी असल्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. आरोपींनी सोनकांबळे यांच्या पोटात लाथा मारल्या. ते खाली कोसळले. या मारहाणीत त्यांच्या पोटाला, हाताला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. पण त्यांनी त्या स्थितीतही आरोपी गौरव शेलारला पकडून ठेवले. त्याचे तीन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंंतर सोनकांबळे यांनी याबाबतची माहिती बोरिवली पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या मदतीसाठी पोलीस पथक बाभई नाका परिसरा रवाना झाले. संदीप सोनकांबळे यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गौरव शेलारला ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर गौरवला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणात गौरवच्या तीन साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची ओळख पटली आहे. आरोपींनी सोनकांबळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला होता. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने इतर तीन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.