मुंबई : देशातील पहिल्या ५०८ किमी लांबीच्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. भविष्यात २.०७ तासात प्रवाशांचा प्रवास होईल. हा प्रकल्प मध्यमवर्गाच्या आकांक्षा पूर्ण करणार असेल. तसेच बुलेट ट्रेनचे तिकीट मध्यमवर्गाना परवडणारे असेल, असे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने ऐतिहासिक अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. घणसोली आणि शिळफाटा बाजूंनी एकाच वेळी खोदकाम करून ४.८ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याच्या कार्यस्थळाला आश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भेट दिली.

यावेळी वैष्णव म्हणाले की, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होईल. सध्या या प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत. ३२० किमीचा व्हायाडक्ट ( लांबलचक पूल) पूर्ण झाला. सर्व स्थानकांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. नदीवरील पूल बांधण्यात येत आहेत. साबरमती बोगदा पूर्णत्वाकडे आहे. तसेच महाराष्ट्रातील कामे सर्वतोपरीने वेगात सुरू आहेत. प्रकल्पाच्या जवळील बांधकामे आणि सागरी पर्यावरणाला धोका होणार नाही, यावर विशेष लक्ष दिले जात आहे, असे वैष्णव म्हणाले.

अर्थव्यवस्था वाढीस चालना मिळेल

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई – अहमदाबाद दरम्यानचा प्रवास फक्त २ तास ७ मिनिटांत पूर्ण होईल. बुलेट ट्रेन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणार असल्याने, अर्थव्यवस्था वाढीस चालना मिळेल. टोकियो, नागोया आणि ओसाका सारख्या प्रमुख केंद्रांना जोडणाऱ्या जगातील पहिल्या बुलेट ट्रेनने जपानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर बहुआयामी परिणाम केला. त्याचप्रमाणे, हा प्रकल्प आणंद, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी आणि मुंबई यांना एकाच आर्थिक कॉरिडॉरमध्ये जोडेल. यामुळे एकात्मिक बाजारपेठ निर्माण होईल आणि या कॉरिडॉरवर औद्योगिक विकासाला गती मिळेल, असे वैष्णव म्हणाले.

दर १० मिनिटांनी बुलेट ट्रेनची एक फेरी धावणार

बुलेट ट्रेन प्रकल्प २०२७ मध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट्य आहे. सुरत – बिलिमोरादरम्यानच्या पहिल्या विभागातील वाहतूक सर्वात आधी सुरू होईल. त्यानंतर २०२८ पर्यंत ठाणे आणि २०२९ पर्यंत वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत बुलेट धावू लागेल. सुरुवातीला गर्दीच्या वेळी दर ३० मिनिटांनी बुलेट ट्रेन धावेल. तर, दुसऱ्या टप्प्यात दर २० मिनिटांनी बुलेट ट्रेन धावले. त्यानंतर वाढती मागणी लक्षात घेऊन दर १० मिनिटांनी बुलेट ट्रेनची फेरी चालविण्याचे लक्ष्य आहे.

आव्हानात्मक परिस्थितीत अभियांत्रिकी उत्कृष्टता

प्रकल्पात व्यापक सुरक्षा उपायांसह प्रगत न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा (एनएटीएम) वापर करण्यात येत आहे. सुरक्षित बांधकाम सुनिश्चित करण्यासाठी त्यात ग्राउंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इनक्लिनोमीटर आणि स्ट्रेन गेज समाविष्ट आहेत.