मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणीसाठा, पिक-परिस्थिती या बाबतचा आढावा घेण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेऊन राज्यभरातील परिस्थिती बैठकीत मांडली.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून दोन दिवसांत वीज आणि पावसाच्या सतर्कतेचे एकूण १९ कोटी २२ लाख भ्रमणध्वनी लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (डिसिजन सपोर्ट सिस्टिम) ने सुसज्ज करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन, अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले. राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राज्यात आठ जणांचा मृत्यू
राज्यात शनिवार, २४ मे ते सोमवार, २६ मे, या काळात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यासह वीज पडून, पाण्यात बुडून, घराची भिंत कोसळून, झाड पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. राज्यभरात आठ जनावरांचांही मृत्यू झाला आहे. उद्या, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसराला लाल इशारा तर रायगड, सातारा, पुण्याचा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला आहे. राज्यभरातील सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.