मुंबईतील घाटकोपर परिसरात पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली कार बुडाल्याची घटना घडली. ही कार विहिरीत बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावरून काँग्रेसने मुंबई महापालिकेवर टीकाही केली. हाच व्हिडीओ ट्विट करत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारला टोला लगावला आहे.

सलग तीन-चार दिवस सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं होतं. त्यातच घाटकोपर परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार राष्ट्रीय बातमीचा विषय ठरली. घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथे असलेल्या रामनिवास या जुन्या सोसायटीत असलेली विहिरीवर सोसायटीने सिमेंटचं छत तयार करून झाकलेली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहनं पार्क करीत असत. मात्र, तीन-चार दिवस झालेल्या पावसामुळे या विहिरीवरील सिमेंट छत खचले. यावेळी इथे पार्क करण्यात आलेली पंकज मेहता यांची कार विहिरीत बुडाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा- Video : मुंबईत घरासमोर पार्क केलेली कार बुडाली; व्हिडीओ व्हायरल, मीम्सचा धुमाकूळ

हा व्हिडीओ ट्विट करत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर निशाणा साधला. देशात पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत, तर डिझेलचे दरही शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. इंधन दरवाढीच्या मु्द्द्यावर बोट ठेवत आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला. “इंधनाचे दर वाढत असल्याने कारने आत्महत्या केली,” असं एकाच वाक्यात भाष्य करत आव्हाड यांनी खोचक टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्धीतून वेळ मिळाला, तर इकडेही लक्ष द्या; काँग्रेसची महापालिकेवर टीका

या घटनेवरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निरुपम घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आणि “अद्भूत! मुंबईतील घाटकोपर परिसरात हळूहळू बुडत असलेली कार… मुंबईतील नागरी सुविधा कशा पद्धतीने रसातळाला चालल्या आहेत, याचंच हे एक उदाहरण आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं प्रसिद्धीतून वेळ मिळाल्यास याकडेही लक्ष द्यावं,” असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.