मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील बनावट पास घोटाळा उघडकीस आला असून बनावट लोकल पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडण्यात आले. तिकीट परीक्षक सुजाता काळगांवकर यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार लक्षात आला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
काळगांवकर या सीएसएमटी ते कल्याण विशेष पथकात कार्यरत आहेत. मस्जिद स्थानकावर कर्तव्यावर असताना त्या प्रवाशांची तिकिटे तपासत होत्या. एका प्रवाशाने सीएसएमटी ते दादर या मार्गासाठी द्वितीय श्रेणीचे तिमाही लोकल पास दाखवले. हा पास २८ ऑगस्ट ते १९ नोव्हेंबर या कालावधीसाठी वैध होता. सुजाता यांना शंका आल्याने त्यांनी प्रवाशाकडे चौकशी केली. प्रवाशाने तिकीट मस्जिद स्थानकावरून काढल्याचे सांगितले. परंतु दाखवलेल्या लोकल पासवर भायखळा स्थानक नमूद केले होते. सुजाता यांनी प्रवाशाचे नाव विचारले असता त्याने शमिन शेख असल्याचे सांगितले. मात्र पासवर मोहम्मद दिलशाद असे नाव होते.
त्यानंतर हा पास बनावट असल्याचा संशय त्यांना आला. काळगावकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आणि त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. तसेच गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील कारवाईसाठी प्रवाशाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे दिली. प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करावा आणि तिकिटे अधिकृत विक्रेते, तिकीट खिडकी किंवा ऑनलाइन माध्यमातून काढावीत, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले.
