संदीप आचार्य

दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढू लागल्याने या ठिकाणी केंद्राची आरोग्य पथके पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर करोनाचे रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी करोना चाचण्यांचा वेग व प्रमाण वाढविण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. मात्र करोना चाचण्या करताना बहुतेक राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांऐवजी प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्याने करोनाची नेमकी आकडेवारी मिळण्यात अडचण होत आहे.

महाराष्ट्रातही बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांऐवजी प्रतिजन चाचण्या करण्यात येत असून जवळपास निम्म्या जिल्ह्य़ांत हे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. प्रतिजन चाचण्यांच्या ठोस निकालाबाबत साशंकता असल्यामुळे ही चाचणी निगेटिव्ह आली. मात्र रुग्णात लक्षणे दिसत असल्यास तात्काळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे आयसीएमआरने जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात दर लाख लोकांमागे जे चाचण्या करण्याचे प्रमाण निश्चित केले आहे तेवढय़ा प्रमाणात चाचण्या केल्या जात नाहीत.

राज्य कृती दलाने जवळपास आपल्या प्रत्येक अहवालात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र मुंबईसह राज्यातील एकाही जिल्ह्य़ात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे कृती दलाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

एक कोटींहून अधिक चाचण्या राज्यात करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी  सांगितले. मात्र यात प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण किती व आरटीपीसीआर चाचण्या किती केल्या हे सांगण्याचे टाळले.

त्यातही ९ नोव्हेंबर रोजी ४१ हजार ७८६ चाचण्या करण्यात आल्या, तर १५ ते १७ नोव्हेंबर या काळात अनुक्रमे २६ हजार ४०, २३ हजार ८३३ आणि २४ हजार ९६८ चाचण्या करण्यात आल्या. करोना वाढू लागल्याने १८ नोव्हेंबर रोजी ५२ हजार ५७३ चाचण्या करण्यात आल्या असून यात ५६४० नवे रुग्ण सापडले.

१८ नोव्हेंबर रोजी मुंबईत २३.६३ टक्के प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या, तर याच दिवशी पुण्यात हे  प्रमाण ३०.२६ टक्के इतके होते. ठाणे (४६.४५), नागपूर (४९.५८), परभणी (८०.२९), भंडारा (७७), सोलापूर (७३) असे होते. केंद्र सरकारने वाढते करोना रुग्ण व दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्यांचा वेग वाढविण्याचा आदेश दिला असला तरी यात आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण काय असावे तेही स्पष्ट करावे, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोव्हेंबरमध्ये घट..

ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजच्या चाचण्यांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात खूपच कमी चाचण्या झाल्यामुळेच रुग्णसंख्या कमी दिसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ३० ऑक्टोबर रोजी राज्यात ६८ हजार ८२८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण कमी होऊ लागले.