मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मंगळवारी दुपारी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने उपनगरीय वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यातच सकाळपासून गाडय़ा विलंबाने धावत असल्याने मंगळवारी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळी जलद मार्गावरील गाडय़ा १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच दुपारी धिम्या मार्गिकांवर झालेल्या या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे धिम्या मार्गावरही गाडय़ांचा खोळंबा झाला. यानंतर गाडय़ा तब्बल अर्धा तास उशिराने धावत होत्या. मात्र जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा विलंब केवळ १५ मिनिटे एवढाच होता. तसेच या दरम्यान एकही सेवा रद्द न झाल्याचेही जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.
मंगळवारी सकाळपासून मध्य रेल्वेवर गाडय़ा उशिराने धावत होत्या. मात्र दुपारी बाराच्या सुमारास ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान धिम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या आणि कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या धिम्या गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्या. यानंतर काही धिम्या गाडय़ा डोंबिवलीपर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या. तर काही गाडय़ा डोंबिवलीपासून डाउन जलद मार्गावर वळवल्या.हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल पाउण तासाचा कालावधी लागला. हा बिघाड कशामुळे झाला, हे संध्याकाळी उशिरापर्यंत कळू शकले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2013 रोजी प्रकाशित
ठाकुर्ली-कल्याण दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड
मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मंगळवारी दुपारी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने उपनगरीय वाहतुकीचा बोजवारा उडाला.
First published on: 04-09-2013 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway disconnected due to signal system failure between thakurli kalyan rout