मुंबई: मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मशीद, भायखळा, माटुंगा स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे बंद पडली. तर मध्य रेल्वेची वाहतूकही कोलमडली. मात्र पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या ओसंडून वाहू लागल्यामुळे रेल्व रुळांवर पाणी साचल्याचा आरोप मध्य रेल्वे प्रशासनाने समाज माध्यमांवरून केला आहे. मध्य रेल्वेने रुळावर पाणी तुंबल्याचे खापर मुंबई महापालिका प्रशासनावर फोडले आहे. त्यामुळे पहिल्या पावसातच प्राधिकरणांमधील वाद रंगू लागला आहे.

पहिल्याच मोसमी पावसात मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा कोलमडली. रेल्वे प्रशासनाने याचे खापर मुंबई महापालिका प्रशासनावर फोडले. रेल्वे रुळांलगतच्या नाल्यांची सफाई करण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका रेल्वे प्रशासनाला निधी देते. मात्र ही नालेसफाई झाली की नाही याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पालिका प्रशासनाने मात्र रेल्वेच्या या आरोपांना कोणतेही उत्तर दिलेले नाही.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू लागताच सखल भाग, रेल्वे रूळांवर पाणी साचते. अशावेळी संपूर्ण रेल्वे सेवा कोलमडून पडते. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर संपूर्ण मुंबई ठप्प होते. लाखो प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. अशी परिस्थिती या पावसाळ्यात उद्भवू नये म्हणून मुंबई महापालिकेने अगदी फेब्रुवारी महिन्यापासूनच नियोजन केले होते.

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन करावे, पावसाळापूर्व कामांची योग्य अंमलबजावणी करावी, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरे करावेत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच महानगरपालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकही घेण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्वे स्थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळक नगर नाला, विद्याविहार रेल्वे स्थानक (फातिमा नगर), कर्वे नगर नाला (कांजूर मार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्वे स्थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच, पश्चिम रेल्वे विभागातील अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली होती. मात्र हे सगळे नियोजन पहिल्याच पावसाच वाहून गेले आहे.