मुंबई : ओएचइ व अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवरील कर्जत – खोपोलीदरम्यान ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत वाहतूक आणि पाॅवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मात्र शनिवार, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने ब्लॉकमुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. ब्लाॅक कालावधीत कर्जत-खोपोली दरम्यानची लोकल सेवा बंद असेल. प्रवाशांना कर्जतपर्यंत प्रवास करता येईल. तर, खोपोली – सीएसएमटी लोकल प्रवास रद्द राहणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन सणासुदीच्या दिवशी ब्लाॅक घेत असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वे विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.

कर्जत यार्ड सुधारणेच्या कामानिमित्त कर्जत अप मार्ग ते नागनाथ केबिनदरम्यान ६ सप्टेंबर रोजी, शनिवारी दुपारी २.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कर्जत – खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. दुपारी ३.३९ वाजता कर्जतहून खोपोली जाणारी लोकल रद्द केली जाईल. तर, दुपारी २.५५ वाजता खोपोलीहून कर्जत जाणारी लोकल रद्द केली जाईल.

रविवार ते मंगळवार (७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर) या कालावधीत दररोज दुपारी २.३० ते सायंकाळी ५ पर्यंत कर्जत अप मार्ग ते नागनाथ केबिनदरम्यान ब्लाॅक घेण्यात येईल. या ब्लाॅकमुळे सलग तीन दिवस दुपारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खोपोली जाणारी लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. तर, कर्जत – खोपोली दरम्यान ही लोकल रद्द केली जाईल. तर, दुपारी ४.३० खोपोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल खोपोलीऐवजी कर्जत येथून दुपारी ४.५७ वाजता चालविण्यात येईल. ही लोकल खोपोली – कर्जत दरम्यान रद्द असेल.

मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी आणि अभियांत्रिकी कामानिमित्त ब्लाॅक घेतला जातो. परंतु, सणासुदीच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिनी खोपोलीवरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा नसल्याने, दुपारच्या सुमारास मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबई महानगरातील गणेशभक्त मुंबईत येतात. परंतु, खोपोली-कर्जत लोकल सेवा रद्द असल्याने प्रवाशांचा खोळंबा होईल.

सणासुदीच्या कालावधीत ब्लाॅक घेणे सुरूच

मध्य रेल्वेने रविवार, ३१ ऑगस्ट रोजी मेगाब्लाॅक घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रविवारी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि मराठा आंदोलकांचा लोकल प्रवास रखडणार होता. या ब्लॉकबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर मध्य रेल्वेने रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता मध्य रेल्वेने पुन्हा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच ब्लाॅकचे नियोजन केल्याने, प्रवासी संतप्त झाले आहेत.