भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलीवहिली गाडी मुंबई-ठाणे यांदरम्यान धावल्याच्या १६ एप्रिलच्या मुहुर्तावर वातानुकुलित गाडीची पहिली चाचणी धाव घडवण्याचा मध्य रेल्वेचा मानस हुकणार आहे. या गाडीत विद्युत यंत्रणा बसवण्यापासून अनेक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी जाहीर केलेला १६ एप्रिलचा मुहूर्त चुकवण्याची नामुष्की आता मध्य रेल्वेवर ओढवली आहे.
चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये तयार झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची वातानुकुलित लोकल गाडी मंगळवारी मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. आता या गाडीतील विद्युत यंत्रणेचे सर्व भाग चेन्नईहून येणार आहेत. कुर्ला कारशेडमधील रेल्वेचे अभियंते-कर्मचारी आणि बीएचईएलचे कर्मचारी-अधिकारी हे एकत्रित काम करून सर्व भाग गाडीत बसवणार आहेत. त्यानंतरच ही गाडी चाचणीसाठी तयार होईल. ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐतिहासिक मुहूर्त वातानुकुलित लोकलच्या चाचणीसाठी पाळणे कठीण होणार आहे. चाचण्या एप्रिल अखेरपासून सुरू होतील. या चाचण्यांनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तही या गाडीची चाचणी घेऊन ती गाडी प्रवाशांसाठी योग्य आहे अथवा नाही, याचे प्रमाणपत्र देतील आणि मगच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2016 रोजी प्रकाशित
वातानुकुलित लोकलच्या चाचणीचा मुहुर्त हुकणार
भारतीय बनावटीची वातानुकुलित लोकल गाडी मंगळवारी मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-04-2016 at 04:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway to postpone ac local train test run