मुंबई : पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकरणी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. तक्रारीला प्रतिसाद देत, केंद्रीय पर्यवरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) महाराष्ट्र पर्यावरण संचालकांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील पवई तलावात दररोज १८ दशलक्ष लीटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे समजताच पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करीत याबाबत पीएमओ सार्वजनिक तक्रार संकेतस्थळावर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत केंद्राकडून राज्य पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलाव सुरक्षित करण्यासाठी आणि नंतर त्याचे संवर्धन करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब एमओईएफसीसी शास्त्रज्ञ एफ पंकज वर्मा यांनी निदर्शनास आणली. पवई तलावामध्ये १८ दशलक्ष लीटर सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रकल्प खात्यामार्फत दोन निविदा काढल्या आहेत, असेही सांगण्यात आले होते. दरम्यान, पवई तलाव स्वच्छ करण्यासाठी माहापालिकेने दिलेली सर्व आश्वासने कागदावरच राहिली आहेत आणि पर्यावरणप्रेमींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी पालिकेने हालचाल केल्याचे मत पर्यावरणप्रेमी बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले.
एकेकाळी मुंबईकर व पर्यटक पवई तलावाला भेट देत होते. मात्र आता हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. जलपर्णी, गाळ आणि सांडपाण्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी ‘सेव्ह पवई लेक’ ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत पवई तलावाचे संरक्षण आणि मगरींसारख्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती नॅटकनेक्ट फाउंडेशनने केंद्राला केली आहे.
मगरींचा अधिवास
पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागात दिसतात. तसेच आयआयटी मुंबई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना दृष्टीस पडल्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात. महानगरपालिकेने २०२२ मध्ये प्रथमच पवई तलावातील मगरींची गणना केली होती. त्यावेळी तलावात १८ मगरी आढळल्या होत्या. या मगरी प्रामुख्याने आयआयटी मुंबई आणि रेनिसंस हॉटेलच्या परिसरात आढळतात.