मुंबई : विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ७ ते ९ ऑगस्ट या कालावधी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. मात्र शुक्रवारी सुटी असली तरी प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली होती. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी ७ ते ९ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार ७ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८६ विद्यार्थांनी प्रवेश घेतले.
मात्र, शुक्रवारी नारळी पौर्णिमेनिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याने प्रवेशासाठी असलेल्या तीन दिवसांतील एक दिवस कमी होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी कमी वेळ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र सरकारने सुट्टी जाहीर केली असली तरी नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयमध्ये जाऊन प्रवेश घ्यावे, असे आवाहन सीईटी कक्षामार्फत करण्यात आले आहे.
विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या १३ हजार २६३ जागांसाठी १७ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली हाेती. त्यातील १४ हजार १६८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला होता. तर १३ हजार १० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये नियमित फेरीअंतर्गत ६३९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला आहे तर कोट्यांतर्गत ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
पहिल्या फेरीमध्ये झालेल्या प्रवेशानंतर रिक्त झालेल्या तपशीलाची माहिती ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दुसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीतील प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १९ ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.