मुंबई : कला क्षेत्रातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्याोजकतेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार अभ्यासक्रमात व कालावधीत बदल करणे आवश्यक असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आठ पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकष व कालावधीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कला क्षेत्रातून पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.

हा बदल ५० वर्षांनंतर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून १९७७ पासून राबविण्यात येत असलेले अभ्यासक्रम अद्याप सुधारित केलेले नाहीत. तसेच, सदर अभ्यासक्रमांचा कालावधी व प्रवेशासाठीची पात्रता साधारणपणे ५० वर्षापूर्वीची आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना नोकरीच्या व उद्याोजकतेच्या पुरेशा प्रमाणात संधी उपलब्ध होत नव्हत्या. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमात व कालावधीत बदल करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ व कला संचालनालयातर्फे कालावधी व शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यासंदर्भातील प्रस्ताव उच्च व शिक्षण विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता देत २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षापासून पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल होणार आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्याबरोबरच मूलभूत अभ्यासक्रम शिकविण्याच्या नावाखाली सरकारचे अनुदान लाटणाऱ्या संस्थांनाही चाप बसणार असल्याचे कला संचालनालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोणत्या अभ्यासक्रमांच्या निकषात केले बदल

उपयोजित कला पदविका, रेखा व रंगकला पदविका, शिल्पकला व प्रतिमानबंध पदविका, कला व हस्तकला – गृहसजावट पदविका, कला व हस्तकला वस्त्रकाम पदविका – प्रििटिंग अॅण्ड ड्रॉईंग, कला व हस्तकला वस्त्रकाम पदविका – व्हिव्हिंग, कला व हस्तकला मातकाम पदविका, कला व हस्तकला धातुकाम पदविका या अभ्यासक्रमांना आता इयत्ता दहावीनंतर थेट प्रवेश मिळणार आहे. तसेच हे सर्व अभ्यासक्रम आता चारऐवजी तीन वर्षांचे असणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० प्रमाणे कला शिक्षण विद्यार्थ्यांना उपयुक्त करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न आहेत. तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पदविका विद्यार्थ्यांप्रमाणे आता कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही अधिक संधी मिळणार आहे. – राजीव मिश्रा, माजी संचालक, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यासक्रमातील बदल कोणते?

कला पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी इयत्ता दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता. त्या अभ्यासक्रमाच्या निकालाच्या आधारे पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत होता. त्यानंतर चार वर्षे पदविका अभ्यासक्रम होता. मात्र नव्या बदलानुसार आता इयत्ता दहावीनंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.