मुंबई : गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत असून आगमन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडणार असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. अनेक मार्गात बदल करण्यात आले आहे.
यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल व निर्बंध लागू केले आहेत.
मुख्य वाहतूक बदल
उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती संभाजीराजे सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) वापर सक्तीचा करण्यात आला आहे. पूर्व मुक्त मार्ग (विलासराव देशमुख फ्री वे) व अटल सेतू मार्गे जाणाऱ्या वाहनांना सीएसएमटी, भाटिया बाग, मेट्रो जंक्शन, प्रिन्सेस स्ट्रीट मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. अनंत चतुर्दशीच्या (६ सप्टेंबर २०२५) दिवशी कुलाबा, मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, गिरगाव, दादर, शिवाजी पार्क, लालबाग, परळ, भायखळा आणि बोरिवलीपर्यंत अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करून अन्यत्र वळवले जाणार आहेत
पार्किंग व वाहन बंदी
विसर्जनाच्या दिवशी अनेक रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ लागू राहणार आहे. यामध्ये कुलाबा, मरीन ड्राईव्ह, दादर, माहिम, चेंबूर, जुहू, मालाड, कांदिवली, बोरिवली यांचा समावेश आहे. जड वाहने व खाजगी बसेस यांचा प्रवेश दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत बंद असणार आहे. तर उपनगरात सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत बंदी असेल. विसर्जनाच्या मुख्य दिवसांत ही बंदी २४ तासांकरिता असणार आहे. महापालिकेने जुन्या व धोकादायक रेल्वे उड्डाणपुलांवर खालील नियम लागू केले आहेत. एका वेळी १०० हून अधिक नागरिकांना पुलावरून जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पुलावर थांबणे, नाचगाणी करणे व डीजे आणि ध्वनीक्षेपक वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
गतीरोधक पट्टे हटवले
१५ ऑगस्ट रोजी खुला करण्यात आलेल्या सांताक्रुझ चेंबूर लिंक रस्त्यावरील गतीरोधक पट्टे (रंबल स्ट्रीप्स) हटविण्यात आले आहे. हे गतीरोधक पट्टे बसवल्यानंतर त्या भागावर निरीक्षण केले असता त्या कार्यक्षम नसल्याचे आढळले. वाहनांचा वेग कमी करण्याऐवजी तो पूर्णपणे वाहने अडखळून थांबत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. वाहतूक पोलिसांच्या शिफारशीवरून मंगळवारी दोन्ही उतरत्या मार्गावरील (लँडिंग पॉइंट) गतीरोधक पट्टे (रंबल स्ट्रिप्स) काढून टाकण्यात आले.