मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी दिली आहे. भुजबळ यांना मंगळवारी सकाळी राजभवन येथे छोटेखानी समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

भुजबळ यांच्याकडील पूर्वीचे अन्न व नागरी पुरवठा हेच खाते कायम ठेवले जाणार आहे. भुजबळ यांच्या समावेशानंतरही मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त आहे. भाजपच्या वाट्याला असलेले हे मंत्रिपद कोणाला दिले जाते, याकडे साऱ्यांचीच उत्सुकता आहे. भुजबळ यांच्याबरोबरच भाजपच्या कोणाचा समावेश केला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण फक्त भुजबळांचाच समावेश करण्यात आला.

शपथविधी सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. शपथविधीनंतर भुजबळ यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. ‘छगन भुजबळ पक्षात कधीच नाराज नव्हते’ असे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मतभेद होते, पण शेवट गोड : भुजबळ

– ‘जहँ नही चैना, वहाँ नही रहना’, असे मी म्हणालो होतो. कारण, पक्षनेतृत्व आणी माझ्यात मतभेद निश्चित होते. पण, याचा शेवट गोड झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी कामाला लागायचे आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानतंर दिली.

– बांठीया आयोगाच्या अहवालामुळे इतर मागास वर्गीयांचे (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण घटले आहे. केंद्रातील मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. आमची ही खूप वर्षांची मागणी होती. यामुळे इतर मागासवर्गीयांची नेमकी आकडेवारी समोर येईल. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात ज्याप्रमाणे निधी वाटप होतो, तसा इतर मागासवर्गीयांनाही होईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

अजितदादा, भुजबळ समोरासमोर, पण…

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. शिंदे यांच्यासमोर भुजबळ बराच वेळ थांबले. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावरून खाली आले आणि भुजबळ थांबले होते तेथे जात पुष्पगुच्छ दिला. त्या वेळी भुजबळ आणि पवार दोघांनी केलेले स्मीतहास्य बरेच काही सांगून गेले.

‘ईडी’भूषण मंत्री : दमानिया

धनंजय मुंडे हे भ्रष्ट मंत्री गेले, त्यांच्या जागी भुजबळ हे भ्रष्ट मंत्री आले आहेत. राज्याला आणखी एक ‘ईडी भूषण’ मंत्री लाभला. मंत्रिपदासाठी सभ्य माणसे नाहीत का? महाराष्ट्रातील राजकारणाची किळस यावी, अशी स्थिती आहे. कितीही आरोप करा, तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही, असे महायुती सरकारला भुजबळ यांना मंत्रिपदी बसवून दाखवून द्यायचे असावे, अशी टीका भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील : जरांगे

जालना : छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या जातीयवाद्यास का पोसायचे, हे अजित पवार यांच्या आमदारांनाही कळत नाही. यामुळे होणाऱ्या परिणामास पवार यांना सामोरे जावे लागेल. भुजबळ यांचे मंत्रिपद हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असला तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरता आनंद दिला असेल’, असे ते म्हणाले.