मुंबई : चाळीशीतील अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून उलगडणारी कथा ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्यातून मांडण्यात आली आहे. मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेने, थिएटरऑन एंटरटेनमेंट आणि पी.एस.डी.जी. स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या सहकार्याने ‘एक तिची गोष्ट’ हा अभिनव नृत्यनाट्याचा आविष्कार प्रेक्षकांसमोर आणला आहे.
या सृजनशील कलाकृतीचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची कन्या आस्मा खामकर यांच्या संगीत, अभिनय, नृत्याची बहारदार अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघींसोबत अभिनेता ओंकार गोखले या नाटकात आहे. या लक्षवेधी कलाकृतीचे लेखन अभिनेता विराजस कुलकर्णी, तर दिग्दर्शन सूरज पारसनीस व विराजस कुलकर्णी यांनी केले आहे.
ज्येष्ठ लेखक दिवंगत मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. यासाठी संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर यांचे सहकार्य लाभले आहे. ‘एक तिची गोष्ट’ या नावावरूनच हा नृत्यनाट्याविष्कार वेगळा असल्याची कल्पना प्रेक्षकांना असून सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. या नृत्यनाट्यातील गाणी आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी गायली असून निषाद गोलांब्रे यांनी संगीतबद्ध केली आहेत. या नृत्यनाट्याचा प्रीमिअर सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे नुकताच पार पडला.
या सोहळ्याला मनोरंजनसृष्टी, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती.‘प्रत्येक स्त्रीने अनुभवावी अशी गोष्ट म्हणजे ‘एक तिची गोष्ट’ हा नृत्यनाट्याविष्कार. या नाटकात प्रत्येक स्त्रीला स्वतःचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. या नृत्यनाट्यात एकूण नऊ गाणी आहेत. या गाण्यांच्या माध्यमातून कथा उलगडत जाते. समरस भावनांनी सजलेले हे नाट्य समकालीन आणि पारंपरिक नृत्यशैलींसह नाट्यमय संवादाच्या माध्यमातून साकारले आहे’, असे नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी सांगितले.