मुंबई : बोरिवलीत दोन गटांत झालेल्या हाणामारीत ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही गटातील लोकांवर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बोरीवली पश्चिमेकडे एमएचबी पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याला लागून शिववडा नावाची वडापाव विक्रीची गाडी आहे. यादव नावाचे कुटुंबिय ही वडापाव विक्रीची गाडी चालवतात. त्यांच्याकडे पवन दुबे नावाचा एक कर्मचारी काम करत होता. काही दिवसांपूर्वी या दुबेच्या परिचयातील महिलेचे छायाचित्र फेसबुकवर टाकण्यात आले होते. त्याबद्दल मागील आठवड्यात दुबे याने येऊन जाब विचारला होता. त्यानंतर फेसबुकवरून ते छायाचित्र हटविण्यात आले होते. सोमवारी या मुद्द्यावरून पुन्हा यादव आणि दुबे यांच्यात वाद झाला होता.

बुधवारी सकाळी दुबे आपल्या तीन साथीदारांसह शिववडापावच्या गाडीवर आला. त्याने चाकूने यादव कुटुंबियांमधील तिघांवर हल्ला केला. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. यादव कुटुंबातील लोकांनीही त्याच चाकूने दुबेवर हल्ला चढवला. या हाणामारीत पवन दुबे तसेच यादव कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. जखमींना कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.