Maratha Reservation Azad Maidan News: मुंबई : पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ नंतर आझाद मैदान परिसरातील वाहने हटविण्यास सुरवात केली. यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. जमाव हटत नसल्याने सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आणि ते आंदोलकांची वाहने हटविण्याचा प्रयत्न करीत होते.

उच्च न्यायालयाने आझाद मैदान परिसर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मंगळवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. पोलिसांनी यासंदर्भात दुपारपासून आवाहन करण्यास सुरुवात केली होती. मात्र आंदोलक ठाम होते. मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर अनेक वाहने उभी होती. त्यात जेवणाचे साहित्य आणण्यात आले होते. पोलीस ही वाहन तेथून काढण्यासाठी सांगत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर वादावादीच्या घटना घडत होत्या. परिणामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी मैदानात उतरले. सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त नवनथा ढवळे, पोलीस उपायुक्त निमित्त गोयल रस्त्यावर फिरून आंदोलकांना आवाहन करीत होते. पोलिसांची वाहने फिरून ध्वनीक्षेपकावरून वाहने हटिवण्याचे, परिसर सोडण्याचे आवाहन करीत आहेत.

सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’

या वाहनात आम्ही जेवणाचा शिधा आणि साहित्य आणले आहे. ही वाहने हटविली तर आंदोलकांना जेवण कोण देणार ?, शासनाने जेवणाची व्यवस्था करावी, असे आंदोलक सांगत होते. यावेळी संतप्त आंदोलक वेगवेगळ्या घोषणा देत होते. पोलीस आंदोलकांना पांगविण्यासाठी आल्याने ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘पाटील पाटील’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.

पोलिसांचा प्रचंड फौजफाटा

परिस्थिती हातळण्यासाठी आझाद मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यात स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, शीघ्र कृती दल आदींचा समावेश होता. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत. आंदोलकांनी सहकार्य करावे, असे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.

आंदोलकांची लक्षवेधी फलकबाजी

यावेळी आंदोलकांनी विविध आशयाचे फलक झळकवले होते. ‘मी जरांगे’ असे नमुद केलेल्या एका आंदोलकाच्या शर्टावर रोषणाई करण्यात आली होती. एका आंदोलकांने भाजपावर टिका करणारा फलक झळकवला होता. न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार सारेच भाजपे आहेत. मग आरक्षण देण्यात कुठे अडचण आहे, असा सवाल या फलकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता.