मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख २६ मे रोजी दुपारी ३ वाजता शाळेत मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल १३ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना २६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या असून, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.