scorecardresearch

“मी देखील गुन्हेगार आहे, कारण…”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी बोलताना उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना मी देखील गुन्हेगार असल्याचं मत व्यक्त केलंय.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना मी देखील गुन्हेगार असल्याचं मत व्यक्त केलंय. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील शिवसेनेची कामगिरी यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. तसेच ज्यांना गद्दारी करायची आहे त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी, असंही म्हटलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी असं वागतो. म्हणजे आपण लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो तेवढ्या जिद्दीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत नाही. माझ्यासह आपले नेते, मंत्री, जिल्हा प्रमुख त्या निवडणुकांकडे त्या पद्धतीने लक्ष देतात का? भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे इतर पक्ष साध्या निवडणुकांकडे देखील लक्ष देतात. अगदी मोठमोठे नेते प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी प्रत्यक्ष रिंगणात उतरून उमेदवारांना सर्व मदत करतात. तशी मदत आपल्याकडून होत नाही. मी माझ्यापासून सुरुवात करतो. तसं पाहिलं तर मी देखील गुन्हेगार आहे.”

“ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी”

“मी तरी कुठं फिरलो? यावेळचा भाग वेगळा होता, पण इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. लढाई निर्णायक निष्ठेने लढायची असते. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात, पण नियमबाह्य काहीही करू नये. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.

“युतीमध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायत जागा जिंकल्या”

उद्धव ठाकरे म्हणाले, “”शिवसेना इतर राज्यात सुध्दा निवडणुका लढवते आहे. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही. विजयाचा उन्माद नको. कधी तरी जिंकणारच. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांकावर असलो, तरी आम्ही जागा किती लढवल्या? अगदी युतीमध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हव्यात.”

“निवडणुकीत निष्काळजीपणा नको, फाजील आत्मविश्वास नको”

“यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजील आत्मविश्वास नको. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सांगेल तुम्ही महाराजांना मानता असं समजा. आज महाराज रायगडावर आहे ते आपल्याला पाठीवर थाप देतील. आजही बाळासाहेब आपल्यातच आहेत. आपण असं काय केलं तर ते आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असा रोज विचार करा. शिवसैनिक समर्थ बलवान आहे,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले, नवहिंदू सगळे भंपक”

उद्धव ठाकरे म्हणाले, “वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा. बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले. नवहिंदू सगळे भंपक आहेत हे नव्या पिढीला माहिती व्हावे. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. मोदींच्या, शहांचा अर्ज भरण्यासाठी गेलो. मनापासून त्यांचा प्रचार केला. आज एनडीए राहिली नाही. जुने ते सर्व गेले. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही. बलवान हिंदुत्व हवंय. आज आपण गप्प बसलो, तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल, तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे.”

हेही वाचा : वापरायचं आणि फेकून द्यायचं हीच भाजपाची नीती, यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं, तेव्हा… : उद्धव ठाकरे

“भाजपाने अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून सरकार स्थापन केले”

“भाजपाने सोयीप्रमाणे काश्मिरात मेहबुबा मुफ्तींसोबत, बिहारमध्ये संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितिश कुमार यांच्यासोबत युती केली. मतांसाठी गोवंश बंदी दूर केली. सरकार पाडून आमदार फोडून तुम्ही सरकार स्थापन केले. असले हिंदुत्व आमचे नाही. शिवसेनेने मर्दासारखी उघडपणे शिवतीर्थावर काँग्रेस सोबत युती केली. दिवस उजाडण्याआधी शपथ घेतली नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोले लगावले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray say i am also guilty while speaking in front of shivsena activist pbs