मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यावरून भाजप-शिवसेनेत (एकनाथ शिंदे) स्पर्धा लागली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर लगेच गुरुवारी सात माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसच्या वरोरा मतदारसंघातील खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह ९ माजी नगरसेवकांनी आणि पालघर जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेते व पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढला असून या दोन्ही पक्षांमध्येही अन्य पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याची चुरस निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेविका आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील नेत्या प्रेमा म्हात्रे, प्रमिला पाटील आणि शैलजा भोईर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेच नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर, हर्षदा भोईर, बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर व सदानंद म्हात्रे या काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते उपेंद्र पाटील यांच्यासह काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महायुतीतील पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा
यावेळी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपलाच या निवडणुकीत मोठे यश मिळेल आणि पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास व्यक्त केला. महायुतीतील मित्रपक्षांचाही सन्मान आहे, पण भाजपच्याच विजयाची खात्री देत महायुतीतील पक्षांमध्येच तीव्र स्पर्धा असल्याचे संकेत दिले. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि राज्यातील अन्य महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेत जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.