मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटप पूर्ण होण्याआधीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने दावा केलेल्या काही जागांवरही उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. ठाकरे गटाने आघाडी धर्माचे पालन करावे, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे उमेदवार यादी जाहीर करून राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. 

महायुतीचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करून एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र आघाडीत अनेक जागांवरून अद्यापही सहमती होऊ शकलेली नाही. तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आपली पहिली यादी बुधवारी सकाळी जाहीर केली. यामध्ये सांगली आणि मुंबईतील सहापैकी चार जागांचा समावेश असल्यामुळे काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. सांगलीची जागा काँग्रेस लढणार हे निश्चित झाले असताना शिवसेनेने उमेदवार उभा करणे कितपत योग्य आहे? संजय राऊत यांच्या कलाने दिल्लीतील नेते राज्यातील कारभार चालवू लागल्यास महाराष्ट्रात काही खरे नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राऊत यांनी उमेदवारी यादी जाहीर करताना जी भाषा वापरली त्यावरही काँग्रेसने आक्षेप घेतला. महाराष्ट्र काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या दावणीला बांधल्याची टीका माजी खासदार संजय निरुपम यांनी केली. दक्षिण मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. सहापैकी चार जागा शिवसेना लढविणार असल्याने काँग्रेसच्या वाटयाला केवळ दोनच जागा येणार असल्याने मुंबईतील पक्षाचे पदाधिकारीही संतप्त झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मात्र सांगली, मुंबईसह उमेदवारी यादी जाहीर करण्याच्या कृतीचे समर्थन केले. शिवसेनेचे दबावतंत्र, वंचितची वेगळी चूल यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक? भाजप-राष्ट्रवादीत अलिखित करार, शिवसेनेत अस्वस्थता

वंचितची वेगळी वाट भाजपच्या पत्थ्यावर?

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बरेच दिवस झुलवले होते. प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर यावे म्हणून त्यांच्या अटी-शर्ती मान्य करण्यास आघाडीचे नेते तयार होते. मात्र आंबेडकर हे अखेरच्या क्षणी चकवा देतील हा आघाडीच्या नेत्यांचा अंदाज खरा ठरला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बरोबर घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचे सुतोवाच आंबेडकर यांनी बुधवारी केले. त्यामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता असून भाजप किंवा महायुतीचा फायदा होऊ शकतो.

पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा शिवसेनेला हवी होती. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असल्यामुळे शिवसेनेने त्या जागेवरील दावा सोडला.- संजय राऊत, खासदार, शिवसेना (उबाठा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगलीमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नसतानाही परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. शिवसेनेने आघाडीच्या धर्माचे पालन करावे. – बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते, काँग्रेस