सर्व नेते व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना स्थानविशेष

अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊन वर्ष उलटल्यानंतर सुमारे २०० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत सर्व नेत्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नवी कार्यकारिणी बनविण्यात आली आहे. सर्व जाती, पंथ, धर्म यांना यात स्थान देण्यात आले आहे. राज्यातील पक्षाचे सारे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, बहुतेक माजी मंत्री यांची सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीत ६७ सरचिटणीस, १९ उपाध्यक्ष, ६० सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारी समिती आणि सल्लागार मंडळावर नेत्यांची वर्णी लावण्यात आली आहे. सल्लागार मंडळात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देविसिंह शेखावत, शिवराज पाटील, बाळासाहेब विखे-पाटील आदींना स्थान मिळाले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ, नारायण राणे यांचे पुत्र नीलेश, शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांचे पुत्र अशोक, माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित, कै. विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष कै. प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर, माजी मुख्यमंत्री कै. ए. आर. अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले आदी नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. प्रवक्तेपदी सचिन सावंत, अनंत गाडगीळ, डॉ. रत्नाकर महाजन, भाई जगताप यांची फेरनियुक्ती झाली आहे. अनेक वर्षे काँग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविणारे आमदार संजय दत्त यांना पदाधिकारी वा कार्यकारिणीवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यांची दिल्लीत वर्णी लागेल अशी शक्यता आहे.