मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे पालिकेच्या पी उत्तर विभागाने शुक्रवारी कारवाई करून हटवली. त्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार आहे. तसेच मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुंड जोडरस्ता मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२.२ किमी लांबीचा हा मार्ग चार ते पाच विभागातून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे, अनधिकृत बांधकामे असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेली एकूण ५१ बांधकामे पी उत्तर विभागाने हटवली. या ५१ बांधकामांमध्ये सात निवासी व ४४ अनिवासी बांधकामांचा समावेश होता.

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

हेही वाचा – मुंबई : विविध बँकांमध्ये खाते उघडून फसवणारी टोळी अटकेत, ५० बँक खात्यांद्वारे २० कोटींची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ ४चे उपायुक्त विश्वास शंकरवार, पी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही कारवाई पार पाडली. दोन जेसीबी सयंत्र , ३० कामगार आणि सात अभियंते यांच्या मदतीने ही बांधकामे निष्कासित करण्यात आली. दरम्यान, मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी / उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने एका पाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.