मुंबई : शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली होती. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. शहरात विविध ठिकाणी पावसाची संततधार होती. काही ठिकाणी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, पवई, सांताक्रूझ, परळ, भायखळा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत १२ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १३ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. मात्र, याचा प्रभाव फारसा होणार नाही. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. घाटमाथ्यावर तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक राहील. मुंबईसह पुणे आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून हलक्या सरी बरसतील.

याचबरोबर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच वर्धा जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. तर धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिलह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.