मुंबई : फलटण येथील डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास तीन डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाणीत ही तिन्ही डॉक्टर जखमी झाले असून, ते भीतीच्या छायेखाली आहेत. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी जुहू पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली आहे..
कूपर रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागामध्ये शुक्रवारी रात्री गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांवर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते. त्याचवेळी संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. मात्र त्यांनी काहीही विचारणा न करता थेट आतमध्ये येऊन कर्तव्यावर असलेले आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (सीएमओ), आंतरवासिता डॉक्टर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना वाचविण्यासाठी पुढे गेलेल्या निवासी डॉक्टरलाही मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी शनिवारी पहाटे जुहू पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. मारहाण झालेले डॉक्टरांवर उपचार करण्यात आले, असून त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती कूपर मार्डचे अध्यक्ष डॉक्टर चिन्मय केळकर यांनी दिली.
दरम्यान, डॉक्टरांना मारहाण करण्यात आली त्यावेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले नव्हते, मात्र त्यापूर्वीच रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. ही समिती कोणता निर्णय घेते यावरून पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल, असे कूपर मार्डचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर यांनी सांगितले.
कूपरमधील डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन
तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी कूपर मार्डने रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून आपत्कालीन, अतिदक्षता विभाग आणि बाह्यरुग्ण विभागात पुरेसे आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे आणि देखरेख करणे, आपत्कालीन विभागात प्रवेशाचे कडक नियमन, महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स कायदा, २०१० अंतर्गत गुन्हेगारांवर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने कूपरमधील निवासी डॉक्टर आणि आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. चिन्मय केळकर यांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून आंदोलन
कूपर रुग्णालयातील डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर झालेला हल्ला ही केवळ एक स्वतंत्र हिंसेचीच घटना नाही, तर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण अपयश आहे. निवासी डॉक्टरांनी सतत भीतीच्या छायेत काम करणे अपेक्षित नाही.
सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत मागण्यांवर तोडगा काढण्यात आला नाही, तर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील निवासी डॉक्टर आणि आंतरवासिता डॉक्टर सामूहिक रजा आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आल्याची माहिती बीएमसी मार्डचे महासचिव डॉ. अमर अगमे यांनी दिली.
अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात
गुन्हेगाराविरुद्ध जुहू पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तिन्ही पाळ्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मार्ड आणि आंतरवासिता डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली असून, त्यांनी रुग्ण सेवा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी सांगितले.
रुग्णालयामध्ये अधिष्ठाता येतच नाही
कूपर रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्या कधीच रुग्णालयामध्ये येत नसल्याने रुग्णालयातील सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच त्यांच्याकडे तक्रार करणे शक्य नसल्याचे काही निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
