मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आता उंदराने एका महिला रुग्णाला कुरतडल्याचे उघडकीस आले आहे. उंदराने कुरतडलेल्या महिलेची प्रकृती स्थिर असली तरी, या घटनेमुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मरोळ येथील शिवाजी नगर परिसरात राहत असलेल्या इंदूमती कदम (८५) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना शनिवारी सांयकाळी कूपर रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने मंगळवारी त्यांना महिलांच्या सर्वसाधारण रुग्ण कक्षामध्ये हलविण्यात आले. महिलांच्या रुग्ण कक्षामध्ये फिरत असलेल्या उंदरांनी बुधवारी रात्री त्यांच्या उजव्या हाताला चार ठिकाणी कुरतडले.
इंदूमती कदम यांची प्रकृती नाजूक असल्याने त्या सतत झोपेत असतात. त्यांना मधूमेहाचा त्रास असल्याने त्यांच्या संवेदना कमी झाल्या आहत. त्यामुळे उंदराने कुरतडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. इंदूमती यांचा नातू गुरूवारी सकाळी रुग्ण कक्षामध्ये त्यांना बघण्यासाठी आला होता. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. उंदराने रुग्णाला कुरतडल्याचे परिचारिकांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र सुरुवातील कोणीही उपचार करण्यास तयार नसल्याने आरडाओरडा केल्यावर डॉक्टरांना बोलविण्यात आले. डॉक्टर आल्यावर त्यांनी तातडीने उपचार केल्याचे इंदूमती कदम यांचे जावई संतोष जाधव यांनी सांगितले.
इंदूमती कदम यांना मधूमेहाचा त्रास असून, उंदरांनी त्यांच्या हाडापर्यंत मास कुरतडून खाल्ले आहे. उंदराने कुरतडलेली जखमी लवकर बरी झाली नाही, तर त्याचा त्रास इंदूमती यांना सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात आम्ही रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे, पण यापुढे अन्य कोणत्याही रुग्णाला असा त्रास होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही संतोष जाधव यांनी व्यक्त केली.
उंदरांचा वावर वाढल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी कूपर रुग्णालयाला गुरूवारी भेट दिली. यावेळी त्यांनी के विभाग कार्यालयातील कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्यांना सात दिवस तेथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांनी उंदीर नियंत्रण उपाययोजना करून रुग्णालयातील सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. रुग्णालयामध्ये उंदरांना आळा घालण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी सांगितले.