महाराष्ट्रासह मुंबईत करोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. करोनाचा प्रसार वाढू नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आल्याने आता या रूग्णालयांमध्ये काम करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क लावणं अनिवार्य असणार आहे.

मुंबईसह राज्यात वाढत आहेत करोना रूग्ण

मुंबई मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने मास्क सक्ती करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयात मास्क वापरण्यास सक्तीचे केले आहे. आज, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काय काय सूचना केल्या आहेत इक्बाल सिंह चहल यांनी?

औषधे किंवा वैद्यकीय खरेदी- महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी.

कोविड चाचण्या- कोविड संसर्ग बाधित रूग्ण वेळीच शोधून काढले तर संसर्गाला अटकाव करता येतो, त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, परिणामी उपचार करणे सोपे जाते. चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.

वैद्यकीय प्राणवायू- कोविड रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते. हे लक्षात घेवून सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे.

विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम) – कोविडच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोविड काळात तत्काळ प्रतिसाद मिळतानाच आवश्यक असलेली मदत देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाची जबाबदारी महत्वाची असेल.

जनजागृतीवर भर द्या, कोविड जागरुकता महत्त्वाची

कोविड रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा.

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ६० वर्षेंपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱयांना देखील सक्ती नसली तर जनतेशी येणारा संपर्क पाहता, त्यांनी मास्कचा यापुढे उपयोग करावा. महानगरपालिका कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना देखील मास्क लावण्याची नम्रपणे विनंती करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी, ही रंगीत तालीम करताना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी, वाढत्या रुग्णसंख्येची गरज लक्षात घेवून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.