मुंबई: क्रेडाई राष्ट्रीय आणि क्रेडाई एमसीएचआय या विकासकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी गृहनिर्माण प्रकल्पासाठीच्या पर्यावरण परवानगी प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून मुंबई महागनर प्रदेशासह राज्यभरात सुमारे दहा लाख झाडे लावण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला.

बांधकाम व्यवसायातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी क्रेडाई राष्ट्रीय आणि क्रेडाई-एमसीएचआयच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंकजा मुंडे यांची भेट घेतली. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव धवल अजमेरा, रुषी मेहता, मदन जैन, राजेश प्रजापती, राजेश गुप्ता, केवळ वलंभिया, हरीश गुप्ता आदींचा समावेश होता. पर्यावरणसंबंधी परवानगीविषयी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती क्रेडाईकडून देण्यात आली.

सीआरझेडअंतर्गत येणाऱ्या पुनर्विकास योजनांसाठी पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आली. तर इतरही अन्य काही मागण्या यावेळी पर्यावरण मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. तसेच एमएमआरसह संपूर्ण राज्यात १० लाख झाडे लावण्याचा प्रस्तावही शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्र्यांसमोर ठेवला. त्यानुसार स्थानिक संस्था, शाळा आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने राज्यभर १० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट क्रेडाई राष्ट्रीय आणि क्रेडाई-एमसीएचआयचे आहे. मुंबई सागरी किनारा मार्गासारखा प्रकल्प, पश्चिम घाटासह अन्य काही ठिकाणी ही १० लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरित राज्य हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही दहा १० लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. विकास करताना पर्यावरणासंबंधीची जबाबदारी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातूनही आम्ही वृक्षारोपण उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी यांनी दिली. तर पर्यावरणासंंबंधीच्या परवानग्या घेण्यासाठी अनेकदा विलंब होतो.परिणामी प्रकल्पास विलंब होतो. त्यामुळे पर्यावरण परवानगीसंबंधीची प्रक्रिया जलद आणि सुलभ होणे गरजेचे आहे. यासंबंधीची मागणी आम्ही पर्यावरण मंत्र्यांसमोर ठेवल्याचे क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव धवल अजमेरा यांनी सांगितले.