लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः हिंदीतील टीव्ही मालिका व चित्रपट राकेश बेदी यांची सदनिका खरेदी करण्याच्या नावाखाली एका भामट्याने ८५ हजार रुपयांची सायबर फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बेदी यांची पुण्यातील कोंढवा परिसरात दोन खोल्यांची सदनिका आहे. ती विकायची असल्यामुळे त्यांनी सदनिकांची खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर त्याबाबत जाहिरात दिली होती. त्यांना २५ डिसेंबरला आदित्य कुमार नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला. आपण भारतीय लष्करात कार्यरत असून आपल्याला संबंधित सदनिका आवडली आहे,असे सांगून त्या व्यक्तीने बेदी यांच्याकडे सदनिकेच्या आणखी छायाचित्रांची मागणी केली. त्यांनी आणखी छायाचित्र पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक दूरध्वनी आला. त्यात माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदनिक आवडली असून सदनिकेची किंमत विचारण्यात आली. बेदी यांनी ८७ लाख रुपये सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने सदनिका खरेदी करण्यास होकार दिला.
आणखी वाचा-थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला १२ जानेवारीपासून सुरुवात
संबंधित रक्कम आपण लष्कर अधिकाऱ्याच्या खात्यातून पाठवत असल्यामुळे त्यासाठी एक प्रक्रिया असल्याचे त्या व्यक्तीने बेदी यांना सांगितले. त्यावेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेली प्रक्रिया केल्यानंतर बेदी यांच्या खात्यात एक रुपया जमा झाला. आता आपण ५० हजार रुपये पाठवत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बेदी यांना काही माहिती तेथे भरण्यास सांगितले. पण बेदी यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे बेदी यांनी पत्नीच्या बँक खात्यातून संबंधित प्रक्रिया केली. त्यावेळी पत्नीच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये हस्तांतरित झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्याबाबत विचारणा केली असता त्या व्यक्तीने काही तरी चुकीची प्रक्रिया झाली. मी तुमचे पैसे परत करतो. त्यासाठी २५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. बेदी यांनी ती रक्कम पाठवली. पण कोणतीही रक्कम बेदी यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाली नाही. त्यावेळी त्याने पुन्हा १० रुपये पाठवण्यास सांगितले. असे करून आरोपीने एकून ८५ हजार रुपयांची बेदी यांची फसवणूक केली. याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.