मुंबई : १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणार्या खासगी ॲप आधारित टॅक्सीच्या चालकाला दादर पोलिसंनी अटक केली. श्रेयांस पांडे (२३) असे या आरोपीचे नाव आहे.पीडित मुलगी १४ वर्षांची असून पवई येथे राहते. बुधवारी ती प्रभादेवी येथील शैक्षणिक संस्थेत उन्हाळी शिबिरासाठी गेली होती. तिने बुधवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास घरी येण्यासाठी एका खासगी ॲप आधारित कंपनीची गाडी बुक केली होती. तिने बुक केलेली गाडी आली. मात्र चालस श्रेयांस पांडे (२३) याने मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेतला. त्याने गाडी पवई येथील तिच्या नमूद केलेल्या पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावर नेली.

तेथे एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर गाडी बिघडल्याची थाप मारून थांबवली. यानंतर मोबाइल बघण्याच्या बहाण्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याने गाडीत कर्कश्श संगीत लावले आणि मुलीला सिगारेट पिण्याबद्दल विचारले. या गैरवर्तनामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने कसाबसा वडिलांना फोन केला. त्यानंतर चालक पांडे मुलीला घराजवळील काही अंतरावर सोडून पळून गेला.

पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी उबेर कंपनीचा चालक श्रेयांस पांडेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२ अंतर्गत विनयभंग, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कंपनीकडून चालकाची माहिती मिळवून त्याल अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.