मुंबई : मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये कार्यरत कायम कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला. मात्र केईएम, शीव, नायर रुग्णालय, नायर दंत रुग्णालय, शिवडीचे क्षयरोग रुग्णालय आणि बोरिवलीतील बाेनमॅरो सेंटर (सीटीसी) या ठिकाणी कार्यरात १२०० रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांना अद्यापही बोनस न मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अखेर अंधारातच पार पडली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या आदेशानंतरही या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा भूषण गगरानी यांनी १६ ऑक्टोबर रोजी केली. दुसऱ्याच दिवशी सर्व कायम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. आयुक्तांच्या आदेशानंतर १६ ऑक्टोबर रोजीच उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचा प्रभारी संचालक पदभार सांभाळत असलेले शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांच्या बोनसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. परंतु अद्यापपर्यंत हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.

परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर रुग्णालय, नायर दंत रुग्णालय, शिवडीचे क्षयरोग रुग्णालय आणि बोरिवलीतील बाेनमॅरो सेंटर (सीटीसी) येथे कार्यरत १२०० रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांना दिवाळी संपली तरी बोनस मिळालेला नाही. बोनस न मिळाल्याने या कामगारांना संपूर्ण दिवाळी अखेर अंधारातच साजरी करावी लागली. दिवाळी बोनसविनाच साजरी करावी लागल्यामुळे रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २००९–१० पासून रोजंदारी कामगार व २०१६–१७ पासून बहुउद्देशीय कामगार काम करीत आहेत. कायम कामगारांच्या बरोबरीने रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार काम करीत असतात. त्यामुळे या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी म्युनिसिपल मजदुर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी २० ऑक्टोबर रोजी सुटी संपवून कामावर रूजू झालेल्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांची भेट घेऊन बोनस देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत विनंती केली.

गतवर्षीच्या बोनसचा प्रस्ताव मार्च २०२५ मध्ये

मागील वर्षीच्या बोनसपोटी पाच हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मार्च २०२५ मध्ये सादर करण्यात आला होता, या विलंबाबाबत आयुक्तांनी विचारणा केल्यानंतर त्यावर उत्तर देण्याऐवजी प्रशासनाने हा प्रस्तावच बास्तानात गुंडाळला. त्यामुळे मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा बोनस एकत्रित द्यावा, अशी मागणी रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांकडून करण्यात येत आहे.

कार्यरत असलेले कामगार

केईएम रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय २५०, तर रोजंदारीवर १५३ कामगार काम करीत आहेत. शीव रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय १०० व रोजंदारीवर ९८ कामगार, नायर रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय २३३ व रोजंदारीवर ७४, नायर दंत रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय ३१ कामगार, क्षयरोग रुग्णालयात रोजंदारीवर ५७, तर बोरिवलीतील बोन मॅरो रुग्णालयात ९८ बहुउद्देशीय कामगार कार्यरत आहेत. या सर्व कामगारांना थेट मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्त करण्यात आले आहे.