मुंबई : चेंबूर येथील स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या कलेक्टर कॉलनीतील देवकीबाई भोजराज चेंराई (डीबीसी) या शाळेतील ७२० विद्यार्थ्यांना सिंधी कॉलनीतील स्वामी विवेकानंद शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. मात्र हा निर्णय मनमानी पद्धतीने, विश्वासात न घेता तसेच पूर्व कल्पना न देता घेण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूरमध्ये सिंधी कॉलनीमध्ये स्वामी विवेकानंद शाळा ही पाचवीपासून अनुदानित तर कलेक्टर कॉलनीमध्ये डीबीसी ही विनाअनुदानित शाळा आहे. विवेकानंद शाळेसाठी इयत्ता पाचवी ते दहावीसाठी प्रत्येकी सहा तुकड्या मंजूर आहेत. मात्र स्वामी विवेकानंद शाळेत जागेची समस्या असल्याने मागील ३० ते ३५ वर्षांपासून प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या या डीबीसी शाळेत भरवल्या जात आहेत. मात्र एप्रिलपूर्वी शिक्षण विभागाने या दोन्ही तुकड्या मंजूर शाळेच्या इमारतीतच भरवणे आवश्यक असल्याचे निर्देश शाळा प्रशासनाला दिले. त्यामुळे शाळा प्रशासनाने एप्रिलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येकी दोन तुकड्यांमधील ७२० विद्यार्थ्यांना डीबीसी शाळेतून स्वामी विवेकानंद शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच विद्यार्थ्यांमार्फत संमतीपत्र पालकांना पाठविले. मात्र हे संमतीपत्र पाठविण्यापूर्वी शाळा प्रशासनाने पालकांना पूर्वकल्पना दिली नाही. तसेच संमतीपत्र भरून न आल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी धमकीवजा सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे काही पालकांनी या संमतीपत्रावर स्वाक्षरी केली, तर काही पालकांनी स्वाक्षरी करण्यास नकार देत प्रशासनाकडे चर्चेसाठी वेळ मागितला. मात्र प्रशासनाने सर्वांना एकत्र न बोलवता पालकांना इयत्तानिहाय बोलवले. या बैठकीत पालकांना दिशाभूल करणारी माहिती देत त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

स्वामी विवेकानंद शाळेत पुरेशा वर्ग खोल्या, प्रसाधनगृहे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे काही पालकाची दोन मुले या शाळेत असून एक मुल इयत्ता सहावीमध्ये तर दुसरे इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. या निर्णयामुळे एक मुल स्वामी विवेकानंद शाळेत तर दुसरे डीबीसी शाळेत असणार आहे. तसेच दोन्ही मुलांच्या शाळांच्या वेळा एकच असल्याने मुलांना शाळेतून ने-आण करण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. डीबीसीमधून स्वामी विवेकानंद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तडकाफडकी स्थलांतरित करण्याऐवजी टप्प्याटप्याने स्थलांतरित केल्यास विद्यार्थी व पालकांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल. असे पालकांचे म्हणणे आहे.

पालक आंदोलनाच्या पवित्र्यात मात्र प्रशासन मनमानीपणे सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यावर ठाम आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करण्याचीही पालकांनी तयारी दाखवली. मात्र, प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात १२ जून राेजी पालकांकडून डीबीसी शाळेबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे काय?

स्वामी विवेकानंद शाळेतील वर्ग डीबीसी शाळेत भरविण्यात येत असल्याने सरकारकडून मंजूर शिक्षकही दिले जात नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संस्थेमार्फत शिक्षकांचे वेतन दिले जात असे. मात्र, काही महिन्यांपूर्वी स्वामी विवेकानंद शाळेतील वर्ग डीबीसी शाळेत भरविण्याबाबत शिक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे डीबीसी शाळेत भरणाऱ्या १२ तुकड्या पुन्हा स्वामी विवेकानंद शाळेत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास ७०० विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र भरून घेतले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च करून अतिरिक्त वर्ग खाेल्या तयार केल्या आहेत. डीबीसीमधून स्वामी विवेकानंद शाळेत पोहचण्यासाठी अर्धा तास लागत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत १० मिनिटे उशीराने पोहचण्याची सवलतही दिली असल्याची माहिती स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त लधाराम नागवाणी यांनी सांगितले.