लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः स्वामित्त्व हक्कभंग केल्याप्रकरणी विलेपार्ले पूर्व येथील एका पंचतारांकीत हॉटेलचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
नोवेक्स कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनी स्वामित्त्व हक्क वितरण व्यवस्थापनाचे काम करते. या कंपनच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तक्रारीनुसार, पंचतारांकित हॉटेलने मार्च २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान तक्रारदार कंपनीकडून अनिवार्य ‘ऑन ग्राउंड परफॉर्मन्स’ परवाना न घेता त्यांच्या हॉटेलच्या आवारात स्वामित्त्व हक्क असलेली विविध चित्रपटांतील गाणी मोठ्या आवाजात ऐकविली. नोवेक्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लि. इरॉस, टिप्स, थिंक म्युझिक, रेड रिबन, सई, झी, दलेर मेहंदी, सुखबीर आणि यशराज चित्रपट यांसारख्या नामांकित चित्रपट निर्मिती आणि संगीत कंपन्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या ‘ऑन ग्राउंड परफॉर्मन्स’साठी कॉपीराइट वितरण व्यवस्थापकीय कंपनी आहे.
याप्रकरणी कंपनीकडून ऑक्टोबर व नोव्हेबर २०२१ मध्ये दोन वेळा संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतरही हॉटेलने स्वामित्त्व हक्क असलेली गाणी ऐकवणे सुरूच ठेवले. तक्रारदाराने घटनास्थळी जाऊन चित्रीकरण केले असून ते पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केले आहे. अखेर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने स्वामित्त्व हक्क कायद्याअंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.