अधिकृत अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या काही कामांत आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा प्रसिद्ध न करताच कामे देणे, किमान निविदा रकमेच्या कामांचा अनुभव नसताना काही कंत्राटदारांना कामे मंजूर करणे यांसारखे प्रकार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘सिडको’मधील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांत झाल्याचा अधिकृत अहवाल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यामुळे आता विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली. बैठकीत एक अधिकृत अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. काही दिवसांत हा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात येईल. त्यात सार्वजनिक उपक्रमांच्या कारभारावरील प्रकरणांत सिडकोच्या प्रकल्पांमध्ये काम देताना झालेल्या अनियमिततांवर बोट ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात काही कामे देताना आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा प्रकाशित न करताच कंत्राटदारांना कामे देण्यात आली. तसेच जवळपास ६९० कोटी रुपयांच्या सहा कंत्राटांमध्ये कमीत कमी विहित किंमत मूल्याच्या कामाचा अनुभव नव्हता तरीही त्यांना कामे प्रदान करण्यात आली. १० कंत्राटांमध्ये विद्यमान कंत्राटदारांना अतिरिक्त कामे निविदा न मागवताच देण्यात आली, असे आक्षेप घेण्यात आल्याची बाब समोर आली. ही कामे झाली त्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि सिडको ज्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येते तो विभाग फडणवीस यांच्याकडे होता, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

याशिवाय फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या उच्चायुक्तांमार्फत झालेल्या चौकशीचा आणि एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा झोटिंग समितीचा अहवालही विधिमंडळात सादर करण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा विचार आहे. मंत्रिमंडळात अहवालावर चर्चा झाल्याचे वृत्त येताच राजकारण तापले.

समिती नेमण्याची मागणी 

सिडकोच्या कामांतील अनियमिततेबाबतचा अहवाल येणे ही गंभीर बाब असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर महाविकास आघाडी सरकारने काय चौकशी करायची आहे ती करावी; पण उगाच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी राजकीय संभ्रम निर्माण करू नये, असे भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.