मुंबई : आभासी कैद अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. पोलिसांनी या फसवणुकीच्या प्रकरणातील १३ कोटी रुपये गोठविण्यात यश मिळवले आहे.

तक्रारदार दक्षिण मुंबईत वास्तव्यास असून ते ७२ वर्षीय व्यावसायिक आहेत. सायबर भामट्यांनी १९ ऑगस्ट रोजी तक्रारदारांना सक्तवसुली संचलनालाय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती त्यांना घालण्यात आली. त्यानंतर आभासी कैद (डिजिटल अरेस्ट) केल्याचे सांगून आपल्या जाळ्यात ओढले होते. १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर २०२५ या काळात त्यांना आभासी कैद करून ५८ कोटी १३ लाख रुपये उकळण्यात आले. आभासी कैदे प्रकरणात आजवर झालेली ही सर्वात मोठी फसवणूक आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. शेख सलाम (१९), जफर सय्यद (३३), अब्दुल खुल्ली (५१), अर्जुन कडवासरा (५२), जेथाराम कडवासरा (३५), इम्रान शेख (२२) आणि मोहम्मद शेख (२६) अशी या आरोपींची नावे आहेत.

१३ कोटींची रक्कम गोठवली, बँक व्यवस्थापक संशयाच्या फेऱ्यात

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत विविध बॅंक खात्यांतील १३ कोटी रुपये रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅंकेचे व्यवहार होत असल्याने बॅंक व्यवस्थापकाची भूमिका पोलिसांना संशयास्पद वाटत असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.