लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांनी बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अभिनेत्री दिपाली सय्यदचे अधोविश्वाशी (अंडरवर्ल्ड) संबंध आहेत. सय्यद यांच्या दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी भादंवि कलम बदनामी करणे, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी ४ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन दिपाली सय्यद यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यात सय्यद यांचे अधोविश्वाशी संबंध आहेत, २०१९ मध्ये त्यांनी बनावट पारपत्र बनवले होते. त्या पाकिस्तानी नागरिक असून त्यांचे नाव सोफिया सय्यद आहे, असे गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्या दुबई व लंडनमध्ये मालमत्ता आहेत, असेही आरोप शिंदे यांनी केले होते. याप्रकरणी सय्यद यांनी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे २०१९ पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना २०१९ मध्ये कामावरून काढले होते. याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.