मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक उतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या कादंबरीचे अधिकृतरित्या हक्क घेऊन चित्रपटाची निर्मिती केली. छावा कादंबरीत लिहिले आहे की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. तसेच ‘लेझीम’ हा आपला पारंपरिक खेळ असल्यामुळे संभाजी महाराज यांनी उत्सव साजरा करताना लेझीम नृत्य केले असल्याचा विचार आपसूकच मनात आला. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या लेझीम नृत्याचा प्रसंग दाखवून कोणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता. परंतु, शिवप्रेमींच्या भावना दुखावणार असतील, तर लेझीम नृत्याचा प्रसंग हा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे, हा प्रसंग आम्ही निश्चितच वगळणार आहोत, असे उतेकर यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे यांचे वाचन अफाट असून त्यांना इतिहास चांगला माहीत आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सल्ला घ्यायचे ठरवले. त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन करून मौल्यवान सूचनाही केल्याचे उतेकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आक्षेपानंतर निर्णय

‘छावा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत असून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर विविध स्तरांतून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या लेझीम नृत्य करतानाच्या प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रसंगावर संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. तसेच उदयनराजे भोसले यांनीही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना भ्रमणध्वनी केला होता आणि इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वादंग संपेल, असे सांगितले होते. तर छावा हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवूनच प्रदर्शित करावा, अशी भूमिका राज्याचे उद्याोगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मांडली होती.