मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत व्यवस्थापक दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. परंतु, याचिकाकर्त्याचा प्रकरणाशी संबंध काय आणि ही याचिका का ऐकली जावी? अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्त्यांना केली. तसेच, याबाबत याचिकाकर्त्यांनी पुढील सुनावणीच्या वेळी प्रामुख्याने युक्तिवाद करण्याचे आदेश दिले.

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने प्रकरण थोडक्यात समजून घेतल्यानंतर याचिका का ऐकली जावी? याची वैध कारणे देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले. दुसरीकडे, ही दाखल झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते व याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्याची मागणी केली होती. त्याची माहिती ठाकरे यांच्यावतीने वरिष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयाला दिली.

तथापि, मूळ याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यापूर्वी याचिका का ऐकावी? त्याबाबत याचिकाकर्त्यांना न्यायालयाचे समाधान करावे लागेल. त्यानंतर अन्य याचिका ऐकायच्या की नाही हे ठरवू, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, याचिकाकर्त्यांनी याचिका का ऐकली जावी यासह ती करण्यामागील हेतू, प्रकरणाची सद्यस्थिती हेही पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्ट करावे, असे आदेश न्यायालयाने दिले व याचिकेची सुनावणी १९ फेब्रुवारी ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिशा हिने आत्महत्या केली नव्हती, असा दावा करून तिच्या खुनाप्रकरणी आदित्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि त्यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. चार वर्षांपूर्वी ८ जून २०२० च्या मध्यरात्री दोनच्या सुमारास दिशाने आत्महत्या केली होती. परंतु, दिशा आत्महत्या केली नव्हती, तर तिचा खून झाला होता. घटनेच्या रात्री दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर एकाच परिसरात होते. त्यामुळे, या सगळ्यांचे मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे, तसेच, १३ व १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. या दोन्ही दिवसांचे या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर बोलणे झाले होते का? असेल तर त्याबाबत सखोल चौकशी आवश्यक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.