दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे. दिवाळीनिमित्त उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आजचा(दि.२७) मध्य व पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पण,  ब्लॉक नसला तरीही या दिवशी मध्य व पश्चिम रेल्वेवर रविवार वेळापत्रकानुसार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. १५-२० टक्के उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द राहतील. सोमवारीही रविवार वेळापत्रकानुसार उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर दररोज १ हजार ७७४ लोकल फेऱ्या होतात. रविवारी ब्लॉक काळात १ हजार १२५ फेऱ्याच होतात रविवारी दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेने मेगाब्लॉक रद्द करून रविवार वेळापत्रकाप्रमाणे उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. परिणामी १ हजार ३५० लोकल फेऱ्याच होतील. मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर लोकल उशिराने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेनेही रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला असला, तरीही या दिवशी रविवारचे वेळापत्रक लागू होईल. सोमवारीही सुट्टीकालीन वेळापत्रक लागू राहील.

आरक्षण केंद्र बंद

२८ ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवरील संगणकीकृत आरक्षण केंद्र दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मोजक्याच तिकीट खिडक्यांवर लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांची सुविधा उपलब्ध असेल.