‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक प्रसिद्ध ; समृद्ध विचारलेणी आणि साहित्याचा खजिना

नामवंत लेखक, विचारवंत यांच्या लेखनाने यंदाचा ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक सजला आहे.

मुंबई : साहित्यिक फराळाच्या गर्दीत समृद्ध विचारांची परंपरा जपणारा ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झाला असून सकस, दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण लेखनाची मेजवानी त्याद्वारे वाचकांना मिळणार आहे.  नामवंत लेखक, विचारवंत यांच्या लेखनाने यंदाचा ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक सजला आहे.

साठोत्तरीतील साहित्य-पत्रकारिता ढवळून काढणाऱ्या आणि लेखनात आदर्श निर्माण करणाऱ्या दिग्गजांपासून या दशकाची स्पंदने टिपणाऱ्या नव्या दमाच्या कथाकारांचे शब्दधन या अंकात वाचायला मिळणार आहे. ‘अकरा कोटी गॅलन पाणी’, ‘थॅंक यू मि. ग्लाड’, ‘डोंगर म्हातारा झाला’ यांसारख्या कादंबऱ्यांनी एकेकाळी साहित्यविश्वात खळबळ माजवणाऱ्या अनिल बर्वे या वादळी लेखकाचे उत्कट शब्दचित्र ‘वादळी व्यक्तिमत्त्वाचे झाड’ या लेखातून दिलीप माजगावकर यांनी रेखाटले आहे. बांगलादेश निर्मितीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘निर्मिती शोनार बांगलाची!’ लेखात कुमार केतकर यांनी पाकिस्तानातून ‘बांगलादेश’ का फुटून वेगळा झाला यामागची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी तसेच त्यावेळचा भारतातील आणि जागतिक माहोल, तत्कालिन पत्रकारिता आणि भोवतालाचे चित्रण करणारा लेख लिहिला आहे.

* अभ्यासपूर्ण लेख..

जगविख्यात विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन याच्या ‘द किड’ या पहिल्या पूर्ण लांबीच्या सिनेमाच्या शताब्दीनिमित्त सिने-अभ्यासक विजय पाडळकर यांनी या चित्रपटाचा घेतलेला धांडोळा. प्रसिद्ध राजस्थानी साहित्यिक विजयदान देठा यांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखनाचा शोध घेणारा आसाराम लोमटे यांचा लेख, ‘बीसीजी’ लस तयार केली गेली त्यास यंदा १०० वर्षे होत आहेत, यानिमित्ताने मानवजातीस साथ आजारावर वरदान ठरलेल्या या लशीच्या निर्मितीचा इतिहास सांगणारा साथरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे.

* करोनाकाळाच्या कविता..

वसंत आबाजी डहाके, नीरजा, दासू वैद्य आणि सौमित्र यांच्या करोनाकाळातील कविता विषाणूवर्षांला शब्दांत अचूक पकडणाऱ्या आहेत.

* विचारविभाग.. 

१९२१ साली स्थापन झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी यंदा साजरी होत आहे. अनेक युरोपीय देशांमध्येही याचवेळी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती. परंतु चीनवगळता ती फारशी यशस्वी झाली नाही. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने मात्र काळानुरूप आपल्या ध्येयधोरणांत बदल करत चीनला जगातील एक महाशक्ती बनविण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्याचा साद्यंत लेखाजोखा घेणारा खास विभाग अंकात आहे.  या परिचर्चेत सुधींद्र कुलकर्णी, अजित अभ्यंकर, डॉ. भालचंद्र कानगो, संकल्प गुर्जर ही मंडळी सहभागी झाली आहेत.

* कसदार कथा..

जगप्रसिद्ध विनोदी लेखक पी. जी. वुडहाउस यांच्या गाजलेल्या कथेचे ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी रूपांतर केले आहे. तर प्राजक्त देशमुख, उमेश मोहिते, वैभव साटम, अनिल साबळे, डॉ, मंजूषा सावरकर, राजरत्न भोजने या नव्या दमाच्या लेखकांच्या कसदार कथा अंकात आहेत.

* नाटक आणि सिनेमा..

‘पॅन इंडियन सिनेमा’ ही संकल्पना विशद करणारा अमोल उदगीरकर यांचा लेख सिनेप्रेमींना खाद्य आहे, तसेच नव्वदोत्तरी मराठी नाटकांचा परामर्श  ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शक अतुल पेठे यांनी घेतला आहे. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकादरम्यानच्या स्ट्रगलविषयी अभिनेते संजय नार्वेकर यांनी सांगितलेली गोष्ट वाचायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali issue 2021 of loksatta released zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या