मुंबई: मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मस्जिद, भायखळा, दादर, शीव दरम्यान पाणी साचल्याने अनेक लोकल एका मागे एक उभ्या आहेत. कुर्ला ते शीव दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत. शेकडो प्रवासी लोकलमध्ये ताटकळत बसले आहेत. मस्जिद आणि भायखळा दरम्यान पाणी साचल्याने, लोकल भायखळापर्यंत चालवून पुन्हा डाऊन मार्गावर धावत आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच ज्या लोकल कुर्ल्यापर्यंत पोहचल्या आहेत, त्यांना कुर्ल्या स्थानकात रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे.
कुर्ला स्थानकात लोकल पोहचल्यानंतर, ही लोकल रद्द केली असून, सीएसएमटी लोकल जाणार नाही, अशी स्थानकात उद्घोषणा केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला आहे. कुर्ला ते शीव दरम्यानच्या ४ मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४० मिनिटे लागले आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
सीएसएमटी यार्डमध्ये पाणी भरलेमध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील यार्डमध्ये पाणी भरल्याने, लोकल सेवा कोलमडली आहे. फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि १० ते १८ वरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. तसेच फलाट क्रमांक ३ येथे पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली आहे. मध्य रेल्वेची मुख्य मार्गिका सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. तर, पश्चिम रेल्वेच्या सर्व मार्गिका सुरळीत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
आसनगाव वरून सुटलेली लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात आली. त्यानंतर ती लोकल कल्याण येथे रद्द करून, कसारा विशेष लोकल म्हणून चालवण्यात आली. प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले आहे. तसेच आसनगावरून सुटलेली लोकल बराच वेळ कळवा येथे उभी आहे. यासह कुर्ला, घाटकोपर येथे लोकल एका मागे एक अडकल्या आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.