मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे – कुर्ला संकुलाच्या धर्तीवर वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून वडाळ्यातील जागांचा ई लिलाव करण्यात येणार आहे. वडाळ्यातील १०८६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ई लिलाव करण्यासाठी महिन्याभरात निविदा काढण्यात येणार आहे. एमएमआरडीएने त्याची तयारी सुरू केली आहे. वाणिज्य वापरासाठी हा भूखंड वितरीत केला जाणार असून या भूखंडाच्या ई लिलावातून एमएमआरडीएला १६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे. या ग्रोथ हबचा आराखडा एमएमआरडीएने तयार केला आहे. या आराखड्यात वडाळ्यातील १५० एकर जागेचा बीकेसीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकास करण्यात येणार आहे. या १५० एकर जागेसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती याआधीच करण्यात आली आहे.
आता वडाळा आर्थिक केंद्र प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार आता येथील १०८६० चौरस मीटरच्या भूखंडाचा ई लिलाव करण्यात येणार असून यासाठी महिन्याभरात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा भूखंड वाणिज्य वापरासाठी असून ८० वर्षांच्या भाडेकरारने भूखंड देण्यात येणार आहे. या भूखंडाच्या ई लिलावासाठी प्रति चौरस मीटर १.५ लाख रुपये अशी बोली निश्चित करण्यात आली असून यातून एमएमआरडीएला १६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
अद्याप बोली दर अंतिम झालेला नसून येत्या काही दिवसात दर निश्चित होईल, त्यानंतरच या ई लिलावातून नेमका किती महसूल मिळेल हे स्पष्ट होईल, असे मुखर्जी यांनी सांगितले. मात्र या ई लिलावातून एमएमआरडीएला चांगला महसूल मिळणार असून या महसुलाचा वापर मेट्रोसह इतर प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.
२०१० नंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव
एमएमआरडीएने २००८ मध्ये वडाळ्यातील दोन भूखंडांचा ई लिलाव केला होता. त्यावेळी जागतिक आर्थिक मंदी असल्याने या ई लिलावास मोठा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २०१० मध्ये या भूखंडांचा पुन्हा ई लिलाव करण्यात आला. २५,००० चौ.मी. भूखंडासाठी झालेल्या ई लिलावात लोढा समूहाने ४०५३ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून भूखंड विकत घेतला. याच भूखंडावर लोढा समूहाने न्यू कफ परेड नावाने टाऊनशीप उभारली. आता २०१० नंतर तब्बल १५ वर्षांनंतर वडाळ्यातील आणखी एका भूखंडाचा ई लिलाव एमएमआरडीएकडून केला जाणार आहे. या भूखंडाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर पुढे टप्प्याटप्प्याने भूखंडांचा ई लिलाव करून वडाळ्यात नवीन बीकेसी उभारण्यात येणार आहे.