मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ‘मिशन २०२७’ चा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘निपुण भारत अभियाना’अंतर्गत २०२७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिली. महानगरपालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असून आपण त्यांच्यातील क्षमता वेळीच ओळखून त्यांना सर्वसमावेशक शिक्षण द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सहविचार सभा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे १३ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करतान सैनी बोलत होते. प्रत्येक विद्यार्थ्यांला शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी सज्ज ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महानगरपालिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेतील अभ्यास यायलाच हवा. यासाठी विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) कसे वाढेल, यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया त्या-त्या इयत्तेतच पक्का होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थ्यांचे शिक्षकच नव्हे तर, पालक व्हा, असे भावनिक आवाहनही डॉ. सैनी यांनी मुख्याध्यापकांना केले.

निपुण भारत अभियान हे भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंकगणित कौशल्ये प्राप्त करणे हा आहे, या अनुषंगाने सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. सहविचार सभेत खान अकादमीचे अमर माळी, आसमान फाउंडेशनच्या अपूर्वा सावंत, मुक्तांगण इंडियाच्या मनाली सावंत यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महानगरपालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अतिशय उल्लेखनीय लागला आहे. यावर्षी देखील निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने भर द्यायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना नववीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असतील, अशा विद्यार्थ्यांची यावर्षापासून ‘स्कॉलर बॅच’ तयार करून दहावीसाठी त्यांची शैक्षणिक तयारी करून घेण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दर शनिवारी विद्यार्थ्यांना करियरसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राची जांभेकर यांनी दिली. त्यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, मुख्याध्यापक आदी सभेला उपस्थित होते.