मुंबई : एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रविवारी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा, असे मत तावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. यासंदर्भात खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खटके उडाल्याने व संघर्षांमुळे नाराज झालेल्या खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. खडसे यांनी भाजपमध्ये असताना आणि पक्ष सोडल्यानंतर अनेकदा फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केली आहे. खडसे यांची पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी प्रलंबित असून जावई गेले दोन वर्षे तुरुंगात आहे. तरीही खडसे यांनी स्वगृही यावे, असे मत व्यक्त केल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना प्रचारापासून बाजूला ठेवल्याने त्याचा भाजपला काही अंशी फटका बसला. पराभवानंतर भाजपने आत्मचिंतन सुरू केले असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.